उरण, विरेश मोडखरकर
उरण, चार फाटा येथे गेल्या वर्षभरापासुन प्रवाशांसाठी बांधण्यात येत असलेली निवारा शेड अपुऱ्या अवस्थेतच पडून असल्याने, येथील प्रवाशांना उन्हातच उभे रहावे लागत आहे. तर ही शेड कधी पूर्ण होणार? असा सवाल येथील प्रवाशांमधून होत आहे.
तिसऱ्या मुंबईसाठी उरण, पनवेल, बेलापूर विभागातील जमिनी संपदीत करण्यात आल्या. यांनंतर नियोजनकार म्हणून “सिडको”ची स्थापना करण्यात आली. या सिडकोच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी नागरी सुविधा देण्यात येणार होत्या. यामध्ये रस्ते, गटार, नाले, वीज, शाळा, दवाखाना, अग्निशमन केंद्र, गार्डन, खेळाचे मैदान यासारख्या अनेक गोष्टी देणे अपेक्षित होते. मात्र उरण तालुक्यामध्ये आजही अशा प्रकारची विकासाची कामे झालेली नाहीत. तर लहान, लहान गोष्टींसाठी येथील नागरिकांना भांडावे लागत आहे. उरण, तालुक्यातील चारफाटा हे ठिकाण शहरातील महत्वाचे ठिकाण मानलेली जात आहे. यामुळे येथील भागामध्ये नेहमीच मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. याच ठिकाणाहून विद्यार्थी, कर्मचारी, हातमजूर, पर्यटक प्रवासला सुरुवात अथवा प्रवासाचा शेवट करत असतात. यामुळे येथे प्रवाशी वर्गाची मोठी गर्दी पहायला मिळते. तर याच ठिकाणी प्रवाशांना निवारा मिळावा यासाठी सिडकोकडून निवारा शेड बांधण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र सदरचे काम मागील एक वर्षापासुन अर्धवट अवस्थेमध्ये असल्याने, येथील प्रवाशांना उन्हा-पावसात रस्त्यावरच उभे रहावे लागत आहे. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर ही शेड केव्हा पूर्ण होणार? असा सवाल आता येथील प्रवाशांकडून होताना दिसत आहे. यामुळे सिडकोने ही शेड आता तरी पूर्ण करावी या मागणीसाठी प्रवाशी आग्रही झाले आहेत.
बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा