पाच महिन्यांच्या विश्रांती नंतर माथेरानच्या राणीची पुन्हा शिट्टी वाजली

कर्जत, गणेश पूरवंत

जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली माथेरानची राणी ही मान्सूनमुळे १० जून पासुन बंद होती. तर माथेरानची राणी म्हणून ओळख असलेली नेरळ माथेरान मिनीट्रेन सेवा ही आजपासून सुरु करण्यात आली आहे. दिवाळी सुट्यांच्या हंगामात पर्यटकांसाठी रेल्वे प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. तर नेरळ माथेरान सेवा आजपासून सुरु होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने ट्रेनला फुलांनी सजवले होते. तर या मिनीट्रेनचे विशेष आकर्षण पर्यटकांना असल्याने सकाळपासून पर्यटकांनी तिकिटासाठी रांगा लावल्या असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचावर सह्याद्रीच्या माथ्यावर माथेरान वसलेले आहे. जगाच्या नकाशावर थंड हवेचे ठिकाण म्हणून अधोरेखित असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक सुट्यांच्या हंगामात येत असतात. माथेरानला पोहचण्यासाठी नेरळपासून दोनच मार्ग आहेत. पहिला रस्तेमार्ग व दुसरा रेल्वेमार्ग ! माथेरानमध्ये पावसाळ्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे मान्सूनकाळात नेरळ माथेरान रेल्वे सेवा मध्यरेल्वे प्रशासनाकडून बंद ठेवण्यात येते. तर शिरस्त्यानुसार दसऱ्याला हि सेवा पूर्ववत करण्यात येते. मात्र रेल्वे मार्ग दुरुस्ती आदिकारणांमुळे थोडा उशीर झाला असला, तरी दिवाळी सुट्यांचा हंगाम माथेरानमध्ये सुरु होत आहे. त्यामुळे या सुट्यांमध्ये पर्यटकांना मध्य रेल्वे प्रशासनाने आनंदाची बातमी देत आजपासून नेरळ माथेरान रेल्वे सेवा सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती जाहीर केली होती. त्यानुसार आज माथेरानच्या महाराणीची सफर करण्यासाठी सकाळपासून पर्यटकांनी रेल्वे तिकीट घेण्यासाठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे ट्रेन सुरु होणार असल्याने प्रशासनाने झेंडू फुलांच्या माळांनी ट्रेनला सजवले होते. यावेळी एनडीएम ४०७ हे इंजिन ट्रेनला जोडणी करून स्टेशन प्रबंधक गुरुनाथ पाटील, मोटरमन सुनिल गोंड, गार्ड दीपक शर्मा, तिकीट तपासनीस अरुण कांबळे, परिवहन निरीक्षक एस.आर कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता सुशील सोनवणे, डिझेल लोको शेड, मध्य रेल्वे कमर्चारी यांनी इंजिनची स्टेशन प्रबंधक गुरुनाथ पाटील यांच्या हस्ते पूजा करून त्यांनी ट्रेनला झेंडा दाखवला. या दरम्यान पहिल्याच दिवशी १०९ तिकिटांची विक्री झाली असून, यामध्ये विस्टा डोम १५, प्रथम वर्ग ५ तर द्वितीय वर्ग ८९ अशी तिकीट विक्री झाल्याची माहिती बुकिंग विभागाचे के.जी विनोद, व विनोद दळवी यांनी दिली. तर यावेळी परदेश पर्यटकांसह माथेरान भ्रमंती करायला आलेल्या पर्यटकांचा उत्साह मिनीट्रेनची सफर होणार असल्याने शिगेला असलेला पाहायला मिळाला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page