१५ पैकी ७ ग्रामपंचातींवर इंडिया आघाडीला यश
अलिबाग, अमुलकुमार जैन
मुरुड तालुक्यातील १५ ग्रामपंचायत निवडणुकीत ७ ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.तर आगरदांडा ग्रामपंचायत वर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. आगरदांडा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी चे आशिष नरेंद्र हेदुलकर यांनी शिंदे गटाचे मुरुड तालुका प्रमुख व आमदार महेंद्र दळवी यांचे खंदे समर्थक तथा मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
इंडिया आधाडीला शीघ्रे, विहूर, नांदगाव, मांडला, भोईघर, चोरडे, व राजपुरी या सात ग्रामपंचायतीवर यश मिळाले आहे.तर बोर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार अस्मिता वामन चुनेकर याना त्यांच्या ५ मताने पराभव पत्करावा लागला आहे.गत ग्राम पंचायत निवडणूकीत त्यांचे बंधू तथा विद्यमान उबाठा गटाचे तालुका प्रमुख, माजी सरपंच नौशाद दळवी यांनी अस्मिता चुनेकर यांचा 168 मतांनी पराभव केला होता.येथे शिंदे गटाच्या सपना संजय जायपाटील (चुनेकर)या विजयी झाल्या आहेत.शिवसेना शिंदे गटाच्या एकदरा, बोर्ली, वळके, तळेखार, काशीद या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात यश प्राप्त केले आहे.भारतीय जनता पार्टीने साळाव व मिठेखार या ग्रामपंचायतीवर स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून विजय प्राप्त केला आहे. आज मतमोजणी असल्याने मुरुड तहसील कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. या निवडणूक निकालाची सर्वानाच उत्सुकता होती.सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात झाली तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले होते. सर्व तालुक्याचे नांदगाव ग्रामपंचायतीकडे लक्ष होते.कारण एक सर्वसाधारण महिला इंडिया आघाडीच्या माध्यमातून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरल्या होत्या.अत्यन्त चुरशीच्या लढतीत अल्पा घुमकर याना ९८४ मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते व ज्यांनी १५ वर्ष नांदगाव ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवली होती असे विलास सुर्वे यांचा २३३ मतांच्या फरकाने पराभव केला.सुर्वे याना ७५१ मतांवर समाधान मानावे लागले.तर नवखे व प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणारे भाजप चे थेट सरपंच पदाचे उमेदवार स्वप्नील चव्हाण याना ६७१ एवढे मोठे मताधिक्य मिळाल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे सिद्ध झाले आहे.नांदगाव ग्रामपंचायत मध्ये इंडिया आघाडीचे मेघा मापगांवकर,विक्रांत कुबल,अंजुम घोले,उदय थळे,विजयश्री रावजी,अमिषा पाटील,नितेश रावजी हे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.इंडिया आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे थेट सरपंच म्हणून शीघ्रे ग्रामपंचायत मध्ये गुलाब वाघमारे,राजपुरी ग्रामपंचायत मध्ये सुप्रिया गीदि,चोरढे ग्रामपंचायत मध्ये तृप्ती घाग,विहूर मध्ये रेश्मा तपीसर या निवडून आलेल्या आहेत.