अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप इंडिया आघाडीने 15 पैकी आठ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदांवर विजय मिळविला आहे. शिवसेना शिंदे गटाने तीन सरपंच पदांवर, काँग्रेसने दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि अपक्षाने एका सरपंच पदावर यश मिळविले आहे. सोमवारी (6 नोव्हेंबर) येथील तहसील कार्यालयावर रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली. मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा केला.
अलिबाग तालुक्यात 15 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर सोयीप्रमाणे आघाडी – युती करण्यात आल्या होत्या. तालुक्यातील 15 सरपंच पदांसाठी 43 उमेदवार तर 157 सदस्य पदांसाठी 399 उमेदवार रिंगणात होते. तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शेकापच्या कुंदा राजाराम गावंड विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या मिनल उमेश मोकल अशी सरळ लढत होती. त्यात शेकापच्या कुंदा गावंड यांनी विजय मिळविला. शेकापने ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खानाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद शेकाप इंडिया आघाडीने खेचून आणले आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे संजय पोशा काष्टे विरुद्ध इंडिया आघाडीचे अजय दशरथ नाईक अशी सरळ लढत होती. त्यात नाईक यांनी बाजी मारली. काँग्रेस नेते अऩंत गोंधळी यांनी गेली अनेक वर्षे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला मात्र त्यानंतर लगेच झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत येथे शिंदे गटाचा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. खिडकी ग्रामपंचायती सरपंचासाठी शेकापचे दत्तात्रेय श्रावण नाईक विरुद्ध काँग्रेसचे महेश चांगू नाईक अशी लढत होती. यात काँग्रेसचे महेश नाईक यांनी विजय मिळविला असून गेली अनेक वर्षे काँग्रेसने खिडकी ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. नागाव ग्रामपंचायती सरपंचासाठी शिवसेना शिंदे गटाच्या रसिका रघुनाथ प्रधान विरुद्ध शेकापच्या हर्षदा निखिल मयेकर यांच्या सरळ लढत झाली. यात शेकापच्या हर्षदा मयेकर यांनी मोठ्या मताधिक्याने प्रधान यांचा पराभव करून नागाव हा शेकापचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या रेवदंडा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी शेकापचे संदीप शांताराम खोत विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या लढत होऊन मोरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे.
वाडगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा घवघवीत यश मिळविले. येथे सारिका गणेश पवार यांनी मनीषा सुरेश नाईक यांचा पराभव केला. आवास ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी शेकापच्या सुषमा सुरेंद्र कवळे, काँग्रेसच्या अभिलाषा अभिजित राणे आणि अपक्ष जान्वही जयेंद्र राणे अशी तिरंगी लढत होती. यात काँग्रेसच्या अभिलाषा राणे यांनी विजय मिळविला. आवास ग्रामपंचायतीवरही काँग्रेसने गेली अऩेक वर्ष आपले वर्चस्व राखले आहे. कामार्ले ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी शेकापच्या अजिता राजेंद्र गावंड, भाजपाच्या सविता मंगेश नागावकर व शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती प्रल्हाद पाटील यांच्यात तिरंगी लढत होती. यात शेकापच्या अजिता गावंड यांनी बाजी मारली. ही ग्रामपंचायत शेकापने सेनेकडून खेचून घेतली आहे. मिळकतखारमध्ये सरपंच पदासाठी शेकापच्या शिल्पा कृष्णा कडवे , शिवसेना शिंदे गटाच्या सविता गोरख कडवे, गायत्री गिरीश कडवे यांच्यात तिरंगी लढत होती. यात सरिता गोरख कडवे यांनी बाजी मारली.
पेढांबेचे सरपंच पद शेकापकडून शिवसेना शिंदे गटाने खेचून घेतले आहे. भाजपच्या मंगल हेमंत ठाकूर, शेकापच्या अपर्णा अजिंक्य पाटील आणि शिवसेना शिंदे गटाच्या रसिका रवींद्र पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत शिंदे गटाच्या रसिका पाटील विजयी झाल्या. शहाबाज ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी शेकापच्या केतकी सतीश तरे, भाजपाच्या पल्लवी नंदकुमार म्हात्रे आणि अपक्ष शुभांगी धनंजय म्हात्रे यांच्यात तिरंगी लढत झाली. यात शेकापच्या केतकी तरे विजयी झाल्या. वाघ्रण ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी शेकापचे राजेंद्र हरिश्चंद्र पाटील, भाजपचे रुपेश दयानंद म्हात्रे आणि शिवसेना शिंदे गटाच्या सुजाता प्रफुल्ल पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यात शेकापचे राजेंद्र पाटील यांनी विजय मिळविला.
खंडाळेमध्ये सरपंच पदासाठी चुरशीची चाैरंगी लढत होती. येथे शेकापचे नासिकेत मधुकर कावजी, शिवसेना शिंदे गटाचे अशोक नारायण थळे, अपक्ष राकेश नागनाथ पाटील आणि भाजपाचे रुपेश सुरदास वर्तक यांच्यात चाैरंगी लढत झाली. त्यात शेकापचे नासिकेत कावजी यांनी अतितटीच्या लढतीत अवघ्या 23 मतांनी शिंदे गटाचे अशोक थळे यांच्यावर विजय मिळविला आहे. शेकापच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत मिळविण्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी केली होती. मात्र सरपंच पद राखण्यात शेकाप यशस्वी झाला आहे.
तालुक्यात भाजपकडे असलेल्या मानकुले ग्रामपंचायतीत भाजपच्या दिशा राकेश पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या सुगंधा संजय पाटील, शेकाच्या जागृती जगन्नाथ म्हात्रे आणि शिवसेना शिंदे गटाच्या रंजना सुनील म्हात्रे यांच्यात चाैरंगी सामना रंगला. त्यात शेकापच्या जागृती म्हात्रे यांनी विजय मिळविला.
किहीम ग्रामपंचायतीत बहुरंगी लढती होती. येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रसाद प्रशांत कर्वे, अपक्ष प्रसाद सुधीर गायकवाड, शेकाप इंडिया आघाडीचे प्रशांत यशवंत दळवी, भाजपाचे प्रशांत मोहन नार्वेकर, अपक्ष राजेश बाळाराम पाटील आणि अपक्ष अनिकेत महादेव बेंद्रे यांच्या बहुरंगी लढत होती. यात अपक्ष प्रसाद गायकवाड यांनी विजय मिळविला.
तालुक्यातील सरपंच पदांवर एका पक्षाचे वर्चस्व तर सदस्य पदांवर विरुद्ध पक्षाचे बहुमत असल्याचे चित्रही अनेक ग्रामपंचायतीत पहायला मिळत आहे. त्यामुळेआगामी काळात उपसरपंच पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून अलिबाग तहसील कार्यालयावर मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीला मानकुले, कामार्ली ग्रामपंचायतींच्या मतमोजणी सुरु झाली. सकाळपासून मतमोजणी केंद्रावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना आवरताना पोलीस प्रशासनाला आक्रमक व्हावे लागले. सर्वात शेवटी रेवदंडाची शेवटची मतमोजणी झाली