उरण, विरेश मोडखरकर
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांचेकडील प्राप्त सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात ‘चक्रीवादळ’ या विषयावर रंगीत तालीम घेण्यात आली. उरण तालुक्यात ओ.एन.जी.सी. कंपनी, उरण गॅस पॉवर प्लांट, केगाव दांडा समुद्र किनारी ही तालीम घेण्यात आली. यावेळी श्रीवर्धन व इतर मासेमारी जेट्टीच्या ठिकाणी वादळामध्ये अडकलेल्या मच्छिमारांचा शोध व बचावाचे कार्य करणे या अनुषंगाने रंगीत तालीम घेण्यात आली. चक्रीवादळाची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशाकीय यंत्रणांच्या तयारीची माहिती घेणे हा रंगीत तालीमीचा मुख्य उद्देश होता.
गुरुवारी सकाळी केगाव दांडा येथे वादळामध्ये अडकलेल्या मासेमारांना कशाप्रकारे सुटका करून, त्यांना सुरक्षित केले जाते. त्यांच्यावर कसे उपचार केले जातात, याबाबत उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्या उपस्थितीमध्ये सरावंघेण्यात आला. यावेळी चक्रीवादळामध्ये वाचवलेल्या नागरिकांना रुग्णसेवा तात्काळ मिळावी यासाठी, तातपुरता बनवलेल्या तंबूमध्ये रुग्णसेवा देण्याबाबत देखील उत्तम सरावं करण्यात आला. उपस्थित नागरिकांना नागरी सौरक्षण दलाकडून अशा आपातकालीन परिस्थितीमध्ये जखमीनां कशाप्रकारे सेवा देता येते, याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. तर आपातकालीन परिस्थितीमध्ये सक्रिय यंत्रणा कशाप्रकारची उपकारणे वापरात आणतात आणि त्याचा काय उपयोग होतो, याबाबत देखील माहिती देण्यात आली.
नागरी सौरक्षण दल, तहसील कार्यालय, उरण नगरपरिषद, पोलीस यंत्रणा, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, पंचायात समिती कार्यालय, सिडको अग्निशमन दल, महाराष्ट्र विद्युत मंडळ, केगाव ग्रामपंचायात, आपातकालीन मदतीसाठी ग्रुप आणि स्थानिक नागरिकांनी या सरावामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.