कर्जत, गणेश पुरवंत
कर्जत तालुक्यात आज दिनांक १२ डिसेंबर रोजी चोरटयांनी उच्छाद मांडला असल्याचे चित्र होते. शहरात पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ३ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेल्याची घटना घडलेली असताना दुपारी डिकसळ येथील सोन्याच्या दुकानात देखील चोरटयांनी डल्ला मारला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पोलिसांपुढे आव्हान उभे झाले असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्जत शहरात सकाळी मॉर्निंग वॉकला महिला जातात. तेव्हा आज दिनांक १२ डिसेंबर रोजी आमराई भागात नंबर नसलेल्या पल्सर गाडीवर दोन व्यक्ती आले. त्यात एकाने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट तर दुसर्याने निळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला होता. त्याचवेळी आमराई येथे काही महिला सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या असताना त्यातील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी त्या दुचाकीवरील दोघांनी ओढून नेली. तर त्यानंतर कर्जत शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप येथील दुसऱ्या महिलेची सोनसाखळी ओढून नेली. त्यानंतर या चोरटयांनी कर्जत एसटी डेपो येथील येथील महिलेला सावज करत तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेली. या घटनेने कर्जत शहरात खळबळ माजली असताना कर्जत पोलिसांसमोर देखील या चोरटयांनी आव्हान उभं केलं. दरम्यान या घटनेची माहिती संबंधितांकडून घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असतानाच कर्जत कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात सुमारे १ ते दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर येऊन दोन चोरटयांनी डल्ला मारला आहे. सोन्याच्या दुकानात भर दिवसा झालॆल्या या चोरीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र डिकसळ व कर्जत येथील चोर सारखेच आहेत का याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. तर डिकसळ येथील चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे येथील चोरीबाबत फिर्याद दाखल करत नेरळ पोलीस याबद्दलचा तपास अधिक कसोशीने करत आहेत. तेव्हा या चोरांना पकडण्यात कितपत यश मिळते व चोरीला गेलेला ऐवज पोलीस परत मिळवतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.