उरण, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील मयंक म्हात्रे या १० वर्षीय मुलाने सागरी १८ कि.मी. अंतर पोहून पार करत, धरमतर जेट्टी ते करंजा जेट्टी या प्रवाहावर कायम स्वरूपी नाव कोरले आहे. या विक्रमाची दखल घेत उरण तालुका मराठी पत्रकार संघाने या बाल विक्रमदीत्याचा सत्कार करून पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उरण तालुका हा समुद्रा किनाऱ्यला लागून असणारा तालुका असल्याने, येथील नागरिकांमध्ये जलतरण येणे हे स्वाभावीक आहे. मात्र नुसते जलतरण येणे आणि त्यातून काही वेगळे करणे याला महत्व निर्माण झाले आहे. अशाच प्रकारे येथील करंजा, कोंढारीपाडा येथे रहाणाऱ्या १० वर्षीय मयंक दिनेश म्हात्रे याने एक वेगळा विक्रम केला आहे. तालुक्यातील अनेकांनी लांब पल्ल्याचे समुद्रीय जलतरणाचे विक्रम याआधी केले आहेत. मात्र मयंकने केलेला विक्रम ही वेगळी नोंद करणारा विक्रम ठरला आहे. मयंकने ९ डिसेंबर २०२३ रोजी धरमतर जेट्टी ते करंजा जेट्टी हे सागरी १८ कि.मी. अंतर ५ तास १३ मिनिटे या निर्धारीत वेळेत पोहून पार केले. पहाटे ४ वाजून १४ मिनिटाने मयंकने काळोखात या विक्रमाला सुरुवात केली. यावेळी धरमतर खाडीमधील JSW इस्पात कंपनीचे पोर्ट तसेच दुसऱ्या बाजूचे कोळशाचे पोर्ट, त्यातच या दोनही पोर्टमधील मोठं-मोठ्या जहाजांची वर्दळ तर मासे पकडण्यासाठी खाडीमध्ये लावण्यात आलेली अनेक जाळी, या सर्वांची आव्हाने पेलत मयंकने करंजा जेट्टी गाठवून आपली ध्येय पूर्ती केली. यामुळे मयंक हा धरमतर जेट्टी ते करंजा जेट्टी हा प्रवाह पार करणारा पहिला जलतरण पटू ठरला आहे. आता या प्रवाह पहिला पोहून पार करणारा जलतरण पटू म्हणून मयंक म्हात्रे याच नाव कायमस्वरूपी रहाणार आहे. त्याने केलेल्या विक्रमची नोंद येथील प्रत्येक नागरिकांनी आपल्या डोळ्यादेखत घेतली आहे. मयंकच्या या विक्रमचा डंका संपूर्ण जिल्हाभरात गाजत असताना, उरण तालुका मराठी पत्रकार संघाने या विक्रमाची दखल घेत मयंक सराव करत असलेल्या उरण नगर परिषदेच्या जलतरण तलाव येथे मयंकचा सत्कार करून पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनशाम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, उपाध्यक्ष दिलीप कडू, पंकज ठाकूर, सुयोग गायकवाड, पूजा चव्हाण यांच्यासह जलतरण तलावातील सराव करणाऱ्या मुलांचे पालक उपस्थित होते.
मयंकने केलेल्या विक्रमची नोंद जिल्ह्यातून विविध स्तरावरून घेतली जात आहे. तर उरण पोलीस ठाण्याच्या पोलीस मित्रांनीही याची नोंद घेत मयंकला पुष्पगुच्छ देत त्याचे अभिनंदन करून शुभेच्छाही दिल्या आहेत.