उरण, वार्ताहर

भानुदास महादेव पाटील यांचे हृदयविकाराने दु:खद निधन
उरणच्या पूर्व भागातील खोपटा पंचक्रोशीतील हरहुन्नरी नाट्य कलाकार भानुदास महादेव पाटील यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी गाढ झोपेतच हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन दुःखद निधन झाले आहे. खोपटे पाटील पाडा गावातील भोलानाथ नाट्य मंडळाचा हा हौशी कलाकार होता. वीजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या दुरुस्तीत माहीर असलेल्या भानुदास पाटील यांचे नाट्यवेड अगदी पंचक्रोशीला आठवणारे असेच आहे. तत्कालीन दिग्दर्शक स्व. दा. जो . मोकाशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भानुदास पाटील यांनी ” रक्ताचा टिळा ” , देव्हारा , आई तुला कशी म्हणू मी , थांब लक्ष्मी कुंकू लावते आदी नाटकांमध्ये केलेल्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.देव्हारा या नाटकात भानुदास पाटील यांनी साकारलेली एक भूमिका तर प्रेक्षकांना रडायला लावणारी असायची अशा हरहुन्नरी नाट्य कलाकाराने आज अचानक आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट घेतल्याने पाटील कुटूंबीय आणि खोपटा पंचक्रोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अतिशय स्मित भाषी आणि नम्र असणारे भानुदास पाटील हे काहीसे खोडकर स्वभावाचे देखील होते. गेली अनेक वर्षे साईबाबांच्या शिर्डी येथील पदयात्रेत सहभागी होणारे ते साईभक्त होते. नुकतेच खोपटे गावातून गेलेल्या पदयात्रेत ते एस टी बसद्वारे जाऊन सहभागी झाले होते. शुक्रवारी रात्री अगदी १२ वाजेपर्यंत कुटूंबीयांशी हसत खेळत झोपी गेलेले भानुदास पाटील यांना शनिवारच्या पहाटेच झोपेतच मृत्यूने गाठल्याने कुटूंबियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास खोपटे पाटील पाड्याच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर हजारो नातेवाईकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा दहाव्याचा कार्यक्रम खोपटे खाडी वरील नाना नानी पार्क येथे सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे तर बारावे ( उत्तरकार्य ) बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी होणार आहे. या निमित्तानी सांत्वनासाठी येणाऱ्या कोणीही कोणत्याही प्रकारचे दुखवटे आणू नयेत असे आवाहन पाटील कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. भानुदास पाटील यांच्या पाठीमागे पत्नी , मुलगा , दोन विवाहित मुली, जावई , सून , नातवंडे , भाऊ , वहिन्या असा मोठा परिवार आहे.