उरण, अजय शिवकर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी रोजी झाला असला, तरी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. हिंदू वर्षाचे दिवस हे तिथीनुसार ओळखले जातात. तर महाराज हे हिंदवी स्वराज्याचे स्थापक असल्याने, महाराजांची जयंती तिथीनुसार देखील साजरी करण्यात येते. म्हणूनच १९ फेब्रुवारीला तारखेनुसार तर २८ मार्चला तिथीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आणि जगभरातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया हर्ष उल्हासाने आणि आनंदाने साजरी केली जाते.
पनवेल तालुक्यातील केळवणे गावातही जाणता राजा कला, सांस्कृतिक व सामाजिक ग्रुप तर्फे गुरुवार २८ मार्चला शिवजयंती महोत्सव आणि शिवछत्रपती पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटाने साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता महाराजांच्या अश्वारूढ पुताळ्याचे अभिषेक व पूजन झाले, त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषणे व गीते तसेच नाटिका सादर केली. संध्याकाळी चार नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाराजांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी व पूजन करून, भगव्या झेंड्याचे अनावरण केले. संध्याकाळी पाच नंतर संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी मोठी मिरवणूक काढून, छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी केली.