कर्जत, गणेश पुरवंत

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असल्याचे चित्र आहे. कर्जत तालुक्यात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्या टिके नंतर आता शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत घारेंवर टीकास्त्र डागले आहे. हिंमत असेल तर आमदार थोरवे यांच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असे थेट आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी सुधाकर घारे यांना दिले आहे. तेव्हा आता पुन्हा घारे या आव्हानांवर पलटवार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँगेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण येथील शिवसेनेच्या मेळाव्यात टीका करत युतीचा धर्म तटकरे यांनी न पाळल्यास त्यांचा कडेलोट होईल म्हटले होते. त्यामुळे दिनांक २४ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते तथा राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद घेत आमदार महेंद्र थोरवे यांना हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची भाषा केली होती. तेव्हा यावर आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. दिनांक 27 मार्च रोजी शिवसेना शिंदे गटाच्या बाळासाहेब भवन कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, जिल्हा संघटक शिवराम बदे, जिल्हा सल्लागार संतोष शिवराम भोईर, खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील, युवासेनेचे कर्जत तालुका प्रमुख अमर मिसाळ आणि नगरसेवक ॲड संकेत भासे या सर्व पदाधिकार्यांनी , भालचंद्र घोडविंदे, सुरेश देशमुख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना संतोष भोईर म्हणाले की आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून महायुतीच्या झालेल्या सभेतील वकृत्वावर बोट ठेवून सुधाकर घारे यांनी ध चा मा करत जी पत्रकार परिषद घेतली. तो महायुतीतील समीकरणाला आणि राजकारणाला गालबोट लावण्याचाच केलेला दुदैवी प्रयत्न ठरला आहे. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यामुळें विरोधकांचा जळफळाट होत आहे. त्यांना आमदार थोरवे यांच्याबाबत बोलायला काही शिल्लक नाही त्यामुळे ते असे काहीतरी मुद्दे उकरून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमदार थोरवे हे त्यांच्या एतीहासिक कामातून यांना पुरून उरले आहेत. घारे यांना आमदार होण्याची मोठी घाई होत असल्याने ते बरळत आहेत. मात्र ते भावीचे भावीच राहणार म्हणत भोईर यांनी घारे यांना निवडणूक लढवण्याचे थेट आव्हान दिले. तर यासह जमलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी देखील घारे यांच्यावर निशाणा साधला.