अलिबाग, अमूलकुमार जैन
शेकापमधून काही लोक सोडून गेलेत म्हणून हतबल होऊ नका, आमच्यातील लोकांनी पक्ष चोरुन नेला आहे. त्यामुळे आम्ही खचलो नाही. तुम्ही देखील नव्या उमेदीने जयंत पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन पवार यांनी मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा हिंदू बोर्डींग मैदानात आयोजित आयोजित मेळाव्यात केले.
महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, निष्ठा, स्वाभिमान सोडून जे आज प्रतिगामी शक्तींसोबत गेले आहेत, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत नापास करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केले.
बुधवारी मुरूड येथे शेकापच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. इंडिया आघाडीने रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे अंनत गीते यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार दिला आहे, तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्याच्या चिखलात सुनील तटकरे रुतले आहेत, असा घणाघात पवार यांनी केला. गीतेंनी आतापर्यंत मंत्रीपदे भूषवली आहेत. मात्र, त्यांनी त्या पदाचा कधीच दुरूपयोग केला नाही अथवा भ्रष्टाचार केला नाही. सुनील तटकरे हे निवडून येण्यासाठी सर्वांच्याच पाया पडतील. त्यांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवा. एकदा का ते निवडून आले की ते मदत करणाऱ्यांना हमखास विसरतात, असेही पवार म्हणाले.
देशात आणि राज्यात इंडिया आघाडीसाठी अत्यंत चांगले वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीची लाट येणार असल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. भाजपाने राज्याची आणि मुंबईची ताकद कमी करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आएफसी सेंटर, हिरे व्यापार यासह अन्य प्रकल्प गुजरातला नेले आहेत. रायगडात येऊ घातलेल्या बल्क ड्रग्ज पार्कसाठी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.दिल्ली अथवा राज्यातील सत्तेत असताना शरद पवारांनी नेहमीच महिला, शेतकरी, कष्टकरी, युवा, बेरोजगार, शेती उद्योग यांना प्राधान्य दिले आहे. यासाठी त्यांनी राज्यात नेत्यांची फळी निर्माण केली होती. त्यातील काहीजण सोडून गेल्याने काही फरक पडत नाही. कारण गेलेल्यांकडे निष्ठा, विचार नाही. त्यामुळे विजय आपलाच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेतकरी कामगार पक्ष सत्तेत कमी आणि विरोधात अधिक वेळा राहिला आहे. मात्र, त्यांनी विचार आणि निष्ठा कधीच सोडली नाही. ते नेहमीच महिला, कष्टकरी, कामगार, शेतकरी, दलित, अल्पसंख्याक यांच्यासाठी लढत राहिले. 2016 साली मराठवाड्यात दुष्काळ पडला होता. त्यावेळी जयंत पाटील हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी तेथे गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी भव्य मोर्चा काढून सरकार आणि प्रशासनाला जागे करण्याचे काम केले होते. ही खरी निष्ठेची आणि विचारांची ताकद आहे. आमच्या घराण्यावर देखील शेकापचेच संस्कार झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.सुनील तटकरे यांनी या आधी काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फसवले आहे. त्यांच्याकडे विचार, निष्ठा नाही. भविष्यात भाजपाच्या कमळामध्ये कोणी पहिली उडी मारेल, तर ते सुनील तटकरे असतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. हिरोजी इंदुलकरांनी रायगड किल्ला बांधताना स्वतःचे घर गहाण टाकले होते. मात्र तटकरे यांनी स्वतःच्या घरासाठी खोट्या 100 कंपन्या काढल्याचे टीकास्त्र पवार यांनी डागले.
आमदार सुनील भुसारा, माजी आमदार अनिल तटकरे,माजी आमदार पंडित पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्तविक तुकाराम पाटील यांनी केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केलें