कर्जत, गणेश पुरवंत
कर्जत घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, रायगड यांना लेखी निवेदन
गुंडगे गांव, पंचशिल नगर, संत रोहिदास नगर, परिसरातील नागरिकांचा लोकसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार! टाकत असल्याचे निवेदन घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, रायगड यांना देण्यात आले आहे. आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गुंडगे गावालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा त्रास होत आहे. आमच्या परिसरात रोगराई पसरली आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास होवू लागले आहेत. आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत. या घाणीमुळे आमच्या परिसरातील विकास खुंटला आहे. तरीही कर्जत नगर परिषदेला जाग येत नाही. आमच्या परिसरातील डम्पिंग ग्राउंड पर्यायी जागेवर हालवण्यात यावे या करीता आम्ही कर्जत नगरपरिषद कार्यालयावर १२ जानेवारी २०२३ रोजी भव्य असा आक्रोश मोर्चा काढला होता. त्यांच्या बरोबर आम्ही कर्जत नगरपरिषदे बरोबर सतत पत्रव्यवहार देखिल केला. तसेच कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार यांना दि. २६/०१/२०२४ रोजी पत्र दिले. रायगड जिल्हा अधिकारी यांना दि. १८/०३/२०२४ रोजी लेखी पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतु आमच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तसेच लोक प्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले आहे.
सदरचे प्रकरण गंभिर स्वरुपाचे असल्याने गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांचनी आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर जाहिर बहिष्कार टाकला आहे. दिनांक १३ मे २०२४ रोजी होणाऱ्या निवडणूक मध्ये गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिक मतदान करणार नाही. या सर्व प्रक्रियेला कर्जत नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार आहे. याची आपण कृपया नोंद घ्यावी. आशा प्रकारचे लेखी निवेदन घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, रायगड यांना देण्यात आले आहे.
निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे आहोत. १). गुंडगे येथील सर्व्हे नं. ६० मधील शासकीय जागेतील डम्पिंग ग्राउंड हटविण्यात यावे. २) डम्पिंग ग्राउंड मधून दररोज दुर्गंधी सुटत आहे. ती तात्काळ थांबविण्याची व्यवस्था करावी. ३) डम्पिंग ग्राउंडमुळे या परिसरात मच्छरांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे तात्काळ उपयोजना करावी. ४) डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी नव्याने सुरु असलेला स्नेक पार्क आणि सायन्स पार्क या प्रकल्पासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे. मात्र आमच्या परिसरातील रस्ते, गटारे तसेच इतर सुविधांसाठी आपल्याकडे फंड उपलब्ध नाही. म्हणून हा प्रकल्प आमच्या हिताचा नसून हा प्रकल्प ताबडतोब बंद करण्यात यावा. ५) डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात कर्जत शहरातील बायोगॅस सारखा प्रकल्प आणू नये. ६) डम्पिंग ग्राउंडमुळे शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्याचा मोहबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. ७) कर्जत शहरातील मोकाट कुत्र्याचे लसीकरण सेंटर डपिंग ग्राउंडवर किंवा आमच्या परिसरात आणू नये. या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.