खोपोली, भक्ती साठेलकर
“बिबट्या वैरी नाही शेजारी” असा संदेश देणारा प्रबोधनपर कार्यक्रम खोपोलीतील विहारी ठाकूरवाडी येथे खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट – पुणे” यांच्या माध्यमातून संपन्न झाला. काही दिवासांपूर्वी खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी झालेले बिबट्याचे दर्शन आणि त्यामुळे जनमाणसात निर्माण झालेली त्याची दहशत दूर करण्यासाठी विहारी ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांसोबत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट – पुणेचे नरेश चांडक आणि सायली पिलाने यांनी संवाद साधत चर्चा केली.

अत्यंत सोप्या भाषेत दृकश्राव्य माध्यमातून बिबट्याच्या बाबतीत सविस्तर माहिती उपस्थितीतांना देण्यात आली. बिबट्या हा वन्य आणि भटक्या प्राण्यांचीच शिकार करतो त्यामुळे मानव हा त्याची भक्ष नसून तो मानवाला घाबरतो हे उदाहरणांसह पटवून दिले. आपापली पाळीव जनावरे गोठ्यात बांधून ठेवावीत, परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून कुत्री आणि डुक्कर यांच्यासारखे भटके प्राणी आपल्या परिसरात वावरणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले. बिबट्याची माहिती मिळताच घाबरून न जाता 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा अथवा वनखात्याशी संवाद साधावा अशी सूचना यावेळी करण्यात आली त्याचसोबत उपस्थितांच्या शंकांचे निवारण देखील केले गेले.
बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी ☝️☝️ येथे क्लिक करा